उन्हापूर्वी मतदान करण्यासाठी अनेक ठिकाणी मतदार केंद्रावर गर्दी झाल्याचे दिसून आले. मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. तरुण नवमतदार व महिलांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून आला. औरंगाबाद शहरात बुथ क्रमांक १६१, २१०,२११, २२२ व इतर अनेक ठिकाणी इव्हीएम बिघडल्याने मतदान प्रक्रियेत व्यत्यय आला. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील गारज, गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथे तर जालना जिल्ह्यातील टाकळी अंबड येथे मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे मतदारांना नवीन मशीन येईपर्यंत ताटकळत उभे रहावे लागले. अलिबाग विधानसभा मतदारसंघात थळ चाळमळा साई मंदिर मतदान केंद्रावर इव्हीएम बिघडल्याने बराच वेळ मतदान सुरू होऊ शकले नव्हते. त्यामुळे मतदारांनी तीव्र संताप व्यक्त केला. माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा येथील मतदान केंद्र क्रमांक १४०, १५८, १६० येथे इव्हीएम एक ते दीड तास बंद पडल्याने मतदान प्रक्रिया बराच वेळ खोळंबली होती.
अंमळनेर येथे जी एस हायस्कूल मतदान केंद्रावर २० मिनिटे उशिराने मतदान सुरू झाले. मतदान यंत्रात बिघाड झाल्याने पुण्यातील कोथरुड येथील भारतीय शिक्षण संस्था केंद्रावर व डोकेवाडी ( ता.श्रीगोंदा) येथील मतदान केंद्रावर अर्धा ते पाऊण तास उशिरा मतदान सुरू झाले. अभोणे (ता. चाळीसगाव) येथील योगेश हाले या नवरदेवाने मतदान केले. माढा, अलिबाग, औरंगाबाद, जालना, पुणे, बारामती, मावळ, सातारा, सांगलीसह सर्वच लोकसभा मतदारसंघातील सखी मतदान केंद्रावर रांगोळ्या काढून मतदारांचे स्वागत करण्यात आले.